...

Monday, January 13, 2014

नामदेवराया, तुम्ही हवे आहात !

महाराष्ट्रात तेराव्या शतकात राज्य होतं ते कर्मकांडाचं. सर्वसामान्य माणूस विविध व्रतवैकल्यांमध्ये जखडून गेला होता. रोजचं साधं जगणंही त्याला अवघड झालं होतं. या सगळ्याच्या विरोधात संत नामदेवांनी बंडाचा झेंडा उभारला. सामान्य माणसाला जगण्याची सोपी वाट दाखवली. सांगताहेत सुनील यावलीकर

या एकविसाव्या विज्ञानवादी शतकातही संतचळवळ जिवंत का आहे. परिवर्तनाच्या चळवळीत कार्यरत कार्यकर्त्यांना नामदेव, तुकारामांच्या खांद्यावर मान ठेवून स्वतःला हलकं का करावंसं वाटतं. आयुष्याच्या अस्वस्थ सैरभैर क्षणी संतांचे बोट का पकडावे वाटते… खूप उद्विग्न क्षणी स्वतःला अधिक क्षमाशील करताना संतच का सोबतीला असतात... याचा जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो… तेव्हा सद्यकालीन स्थितीमध्ये विज्ञानाची प्रगती, तंत्रज्ञानाचा वापर या अर्थाने झालेला विकास हा भाग जरी सोडला तरी संतकालीन मध्ययुगीन कालखंडातील स्थिती यामध्ये मानसिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या अर्थाने खूप काही जाणवण्याइतका बदल दिसत नाही.
तत्कालीन व्यवस्थेवरचे संतांचे चिंतन, भाष्य, मुक्ततेचे उपाय हे कालातीत वाटतात. या क्षणी आपली वाट सोपी करतात. संतांची जगण्याची ही मानवीय चळवळ तेराव्या शतकात निर्माण झाली. चळवळीच्या निर्मितीची मुळे समाजव्यवस्थेमध्ये दडलेली असतात.

संतचळवळीच्या निर्मितीचा कालखंड अत्यंत विदारक असा होता. सामाजिक अवस्था अत्यंत विषमतापूर्वक होती. चातुर्वर्ण्याची चौकट घट्ट होती. सर्वत्र वैदिक धर्म आणि संस्कृत भाषेचे वर्चस्व होते. मनुस्मृतीची आज्ञा शिरसावंद्य होती. उच्चवर्णीय वैदिक धर्माचे अनुयायी संस्कृतमधून ग्रंथ लिहीत होते. धर्माची कवाडे फक्त उच्चवर्णीय ब्राह्मणांनाच उघडी होती. शिकण्याचा वेदपठणाचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता. इतरांना ज्ञनाची कवाडे पूर्णतः बंद होती.

No comments:

Post a Comment