नरसी मेहता हे गुजरातचे आद्य संतकवी. त्यांच्यावरचा नामदेवांचा प्रभाव स्पष्ट आहे. नामदेव आणि नरसी या भावबंधाच्या पायावरच महाराष्ट्र आणि गुजरात हा भावबंधही उभा राहिला आहे, याची नोंद घ्यायला हवी. सांगत आहेत, अहमदाबादचे पत्रकार धवल पटेल
गुजरातेत कुठेही जा संतकवी नरसी मेहतांचा प्रभाव दिसून येतोच. वैष्णव जन तो या त्यांच्या काव्यामुळे तर आज ते भारतभर पोहोचले आहेत. आपल्या रसमधुर भक्तिकाव्याने गुजरात-राजस्थानातीलच नव्हे, तर समस्त भारतीय भाविकांची मने मोहून टाकली आहेत. ते गुजरातीचे आद्यकवी म्हणूनही गौरवले जातात. पण गुजराती न कळणा-यंना देखील मोहवून टाकेल इतकं त्यांचं काव्य सहजसुंदर आणि भावपूर्ण आहे. त्यांच्या उदयानंतरच खऱ्या अर्थाने गुजरातेत भक्तिकाव्याची सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्णाच्या लीलागायनात हरवलेला हा कविराज अनेक सारस्वतांना स्फूर्ती देऊन गेला. जनमनावर त्याच्या भक्तिगीतांचा विलक्षण ठसा उमटला.
महाराष्ट्राला नरसी मेहता माहीत आहेत, ते महिपतीबुवा ताहिराबादकरांच्या ‘भक्तविजया’मुळे. त्यात वारकरी संतांबरोबरच नरसींचंही चरित्र आहे. त्याशिवाय नामदेवांचीच नाममुद्रा घेऊन काव्य करणा-या विष्णुदास नामा या सोळाव्या शतकातील कवीनेही नरसींचं चरित्र मराठीत लिहिलं आहे. नामसाधर्म्यामुळे ते नामदेवांच्या नावावरही चढवण्यात आलं आहे. पण नामदेव हे नरसींचे पूर्वसूरी आहेत, यात आता कोणालाही संशय नाही. नरसींच्या गीतांत नामदेव, कबीर यांच्याविषयींचा आदरभाव व्यक्त झालेला आहे. नामदेव-कबीरांनी आपल्याला वाट दाखविली, असं ते म्हणतात. ‘आपी कबीर अविचल वाणी, नामदेव हरिशुं प्रीत्य।‘, अशी नरसींची कबीर-नामदेवांविषयीची कृतज्ञ भावना दिसते.‘हारमाळा’या नससींच्या गाथेत नामदेवांचा उल्लेख अनेकदा आलेला आहे.
No comments:
Post a Comment