पंढरपूर इथेच चंद्रभागेच्या तीरावर संत नामदेवांनी क्रांती घडवली. हीच त्यांची जन्मभूमी आणि काही विद्वानांच्या मते जन्मभूमीही. पण नामदेवराय आजच्या पंढरपुरात सापडतात का, हा शोध घेतला आहे ज्येष्ठ संपादक पराग पाटील यांनी.
उत्तरेतली माणसं पंढरपूरमध्ये आली की खंतावतात. त्यांचे महान संत नामदेवबाबाजी इथे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीपुरतेच सीमित कसे काय, असा प्रश्न त्यांना पडतो. आज तीर्थक्षेत्रांची संस्थानं आणि प्राधिकरणं होण्याच्या काळात पंजाबातल्या लोकांना असा प्रश्न पडणं साहजिक आहे. कारण अगदी लाहोरपासून अमृतसर, जालंधर, हयालपूर, घुमान, गुरुदासपूर, जोधपूर, जयपूर, भरतपूर, बिकानेर, अलवार इथे नामदेवांची मोठी मंदिरं आहेत. नामदेवांच्या नावाच्या विहिरी आणि तलाव आहेत. तिथे नामदेवांच्या मोठ्या यात्रा भरतात. इथे नामयाच्या पंढरीत नामदेवांची अवस्था दुर्लक्षित असल्यासारखी त्यांना वाटली तर त्यात नवल ते काय. दुर्लक्षित हा शब्द वापरला, उपेक्षित नाही. कारण नामा महाराष्ट्रात उपेक्षित होऊच शकत नाही. इतकं त्यांचं संचित मोठं आहे. मात्र हल्ली वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिकतेला जी भौतिक झालर लागली आहे त्या निकषावर मात्र पंढरपुरातून देशभर पदयात्रा करून प्रभाव टाकणारे नामदेव पंढरीतच दुर्लक्षित तर झाले नाहीत ना याचा शोध घेणं क्रमप्राप्त होतं.
भागवत धर्माच्या सर्वच संतांचं पंढरीशी अतूट नातं. पांडुरंगाचे निस्सीम भक्त आणि संत म्हणून नामदेव उलगडतात. पंढरपूर या तीर्थाशी निगडित त्यांचं डायनॅमिक्स वेगळंच आहे. आधुनिक कॉर्पोरेट निकष लावून नामदेवांच्या चरित्राकडे पाहिलं तर लक्षात येतं की ज्ञानदेव हे भागवत धर्माचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक असतील तर नामदेव हे त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. भागवत धर्माची धुरा खांद्यावर घेतलेल्या महात्म्यांना संतपण बहाल करून त्यांचा दुवा सर्वसामान्यांशी जोडण्याचं अद्वितीय काम नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी केलं. ओव्या, अभंग, कवनं, भारुड, रचना आपल्या कीर्तनाद्वारे लोकांपर्यंत पोहचवल्या आणि ज्ञानोबारायांच्या बंडखोरीला व्यापक क्रांतीचं स्वरूप दिलं. हे जबरदस्त ब्रॅण्डिंग नामदेवांनी साधलं ते पंढरपूरच्या नाममाहात्म्यावर. कर्मकांडांमुळे धर्मग्लानी आलेल्या निरक्षर रयतेला केवळ नाममहिम्यातून भगवंताचा साक्षात्कार घडवून आणून त्याचा एक आध्यात्मिक जनप्रवाह तयार करण्याचं श्रेय नि:संशय नामदेवांना जातं.
No comments:
Post a Comment