आज पंजाबावरचा संत नामदेवांचा प्रभाव प्रसिद्ध आहे. पण त्यांचा तितकाच दृश्य प्रभाव राजस्थानातही दिसून येतो. तिथे नामदेवांना पूजनीय मानणा-या शिंपी तसेच अन्य समाजांची संख्या खूपच मोठी असल्यामुळे हा प्रभाव जाणवतो. त्यामुळे शिंपी समाजाच्या वस्त्यांमध्ये गेल्यानंतर तिथे नामदेवांची अनेक मंदिरं आढळतात. अनेक ठिकाणी दुकानांवर, हो़र्डिंगमधे नामदेवांचे फोटो दिसून येतील. हे नामदेव पंजाबी नामदेवांसारखे बुचडा बांधलेले नसून मराठी नामदेवांसारखे पुणेरी पगडी घालणारे आहेत. नामदेवांची राजस्थानात कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे मंदिरं असतीलच.. नामदेवांचा हा प्रभाव त्यांच्या आठशे वर्षं जुन्या तीर्थयात्रेमुळे आहे.
उत्तर भारतात वारंवार तीर्थयात्रा केलेल्या नामदेवांनी वाटेतल्या राजस्थानमध्ये अनेक दिवस मुक्काम ठोकला. नामदेव पहिल्यांदा राजस्थानात गेले ते श्री ज्ञानदेवांच्या सोबत. या दोन्हीही महापुरुषांच्या यात्रेची स्मृती इथं अजूनही जपली जाते. त्याची एक कथा आहे. बिकानेरपासून ५० मैलांवरील वाळवंटी प्रदेशात चालत असताना दोघांनाही खूप तहान लागली. शोधता शोधता त्यांना एक खूप खोल विहीर दिसली. तेव्हा ज्ञानदेवांनी लघिमासिद्धीचा अवलंब करून सूक्ष्म देह धारण केला. ते विहिरीत उतरले आणि ते पाणी प्यायले. नामदेवासाठी योगसिद्धीने पाणी आणून देण्याची तयारीही त्यांनी दाखवली.
No comments:
Post a Comment