महाराष्ट्र से आया हूँ , बाबा नामदेवजी पर पढाई कर रहा हँ... अशी ओळख करून दिली की घुमानमधील अनेकांच्या चेहर्यावरील भाव बदलायचे. कोणीतरी ‘आपला’ दूरून भेटायला आल्यानंतर जसे वाटते, तशी भावना त्यांच्या बोलण्या-वागण्यातून जाणवायची. उरलेल्या पंजाबमध्येही अनेक ठिकाणी असाच अनुभव आला. ही सारी संत नामदेवांची पुण्याई होती. ते आपल्या आयुष्याची शेवटची २० वर्षे पंजाबमध्ये होते. गुरू नानकदेवांनी शीख धर्माची स्थापना करण्याआधी सुमारे २०० वर्षे त्यांनी पंजाबी समाजात समतेचे, मानवतेचे अंकुर फुलवले. म्हणूनच पवित्र गुरुग्रंथसाहेबात नामदेवांची ६१ पदे आहेत. शीख धर्मात दहा गुरूंप्रमाणेच प्रातःस्मरणीय असणार्या १५ भगतांमध्ये नामदेवांना ‘भगत शिरोमणी’ म्हणून ओळखले जाते. गुरू अर्जुनदेवांनी तर ‘नामे नारायणे नाही भेद’ असे सांगत नामदेव आणि परमेश्वरामधील अंतरच संपवले. आज साडेसहाशे वर्षानंतरही पंजाबी मनात असलेले त्यांचे स्थान फार मोठे आहे. ते पाहिले की, ‘नामदेवांनी शीख धर्माचा पाया घातला’ या अभ्यासकांच्या मताची मनोमन साक्ष पटते... सांगताहेत, थेट पंजाबमध्ये जाऊन नामदेवरायांचा शोध घेऊन आलेले ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वेबसाईटचे प्रमुख नीलेश बने.
पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान हे तसं गावही नाही आणि शहरही नाही... पंजाबात त्याला `कसबा` म्हणतात. मराठीत आपण बाजारपेठेचं गाव म्हणतो तसं... गावात दुकानं, दुकानांच्या वर किंवा मागे राहती घरं. ज्यांची दुकानं नाहीत त्यांची नुसतीच घरं आणि गावाभोवती लांबचलांब पसरलेली शेतं, असं हे गाव. गावातल्या प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक घरात एक दाढीवाल्या बाबांचा फोटो, डोक्यारील केसांचा बुचडा बांधलेला आणि हातात जपमाळ घेतलेला...
ते म्हणतात हा बाबा नामदेवांचा फोटो... पण आपल्याला हे नामदेव वेगळेच भासतात. चकाचक दाढी करून बा विठ्ठलापुढे वीणा वाजवत कीर्तन करणार्या नामदेवांचा फोटो आपल्याला परिचयाचा. त्यामुळे त्यांचा हा पंजाबी अवतार पूर्णपणे अनोळखी वाटतो. पण संपूर्ण पंजाबमध्ये नामदेव याच रुपात भेटत राहतात. अगदी घुमानमध्ये जेथे बाबा नामदेवांची समाधी असल्याचं पंजाबी लोक मानतात, त्या अंतिम स्थानावरही याच रुपातील त्यांची सोन्याची प्रतिमा घडवण्यात आलीय.
No comments:
Post a Comment